🔶कविता-तुकाराम-शेक्सपिअर भेट🔶
कवी-विंदा करंदीकर
तुकोबाच्या भेटीl शेक्सपीअर आला
तो झाला सोहळा l दुकानात ll
जाहली दोघांची l उराउरी भेट
उरातले थेट l उरामधे ll
तुका म्हणे,"विल्या l कर्म तुझे थोर
अवघाची संसारl उभा केला"॥
शेक्सपीअर म्हणे,"एक ते राहिले
तुवा जे पाहिलेl विटेवरी"ll
तुका म्हणे,"बाबा l ते त्वा बरे केले
त्याने तडे गेले l संसाराला ll
विठ्ठल अट्टलll त्याची रित न्यारी
माझी पाटी कोरीl लिहोनियाll"
शेक्सपिअर म्हणेl "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळलेl शब्दातीतll
तुका म्हणे गड्या । वृथा शब्दपीट
प्रत्येकाची वाट । वेगळाली ||
वेगळिये वाटे । वेगळिये काटे;
काट्यासंगे भेटे । पुन्हा तोच ||
तुका म्हणे,"ऐक l घंटा ही मंदीरी
कजागीण घरी l वाट पाहे ll"
दोघे निघोनिया l गेले दोन दिशा
कवतिक आकाशा l आवरेनाll
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🔷अहिराणी अनुवाद
कविता-तुकोबा -शेक्सपियर भेट
कवी-नितीन खंडाळे,चाळीस गाव
तुकोबाले भेटाले शेक्सपिअर उना,
हाई गोट झायी दुकानम्हा ||
दोन्हीस्नी झायी कडकडीसन भेट
मनम्हानल गये मनम्हान थेट ||
तुका म्हने, "ईल्या,काम तुन्ह भारी
आख्खी दुनिया उभी करी ||
शेक्सपियर म्हने,"एक राही गय
तू जे देखं,ईटास्वर ||
तुका म्हने,"भो! ते तु बर कय
तेना पायरे तडा पडी गयात संसारमा ||
ईठ्ठल अट्टल,त्येन्ही गोट न्यारी
मन्ही पाटी कोरी, लिखिसनबी ||
शेक्सपियर म्हने,"तुन्हा शब्दसमुये
माटीमा खेयनात शब्दातीत ||
तुका म्हने भो, बिनकामनी बाचाबाची
परतेकनी वाट, वालीवाली ||
वालीवाली वाटना, वालावाला काटा;
काटासंगे भेटे,आखो तोच ||
तुका म्हने, "आयक!घंटा मंदीरनी
कजागीन घर वाट देखी रायनी ||
दोन्हीबी निंघी गयात, दोन दिशास्ले
कौतिक आभायले आवराये ना ||
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷वर्हाडी अनुवाद
कवी- लोकमित्र संजय सोनटक्के,नागपूर
तुकोबाच्या भेटीले शेक्सपिअर आला !
तो कार्यक्रम झाला दुकानात ॥
दोघेही भेटले जमके कडाडून
मनातल गेल मनातच सरक ॥
तुका म्हणे विल्याल्या बाबू तुय काम भल्ल मोठ
सारा संसार च उभा केला॥
शेक्सपिअर म्हणे, एक ते रायलच
तु जे पायल इटीवर ॥
तुका म्हणे बावा , तु बर केल
त्याच्याच्यान त तडकला संसार॥
विठ्ठल अट्टल त्याची गोटच अल्लग
मायी पाटी कोरीच ,लीहूनयी॥
शेक्सपिअर म्हणे तुया शब्दाच्यान
मातीत खेळल शब्दातीत॥
तुका म्हणे, गड्या फुक्कटचे शब्द
सगळेयचा रस्ता अल्लग ॥
अल्लगच रस्ता अल्लगच काटे
काट्यासोबत भेटते अजून तोच ॥
आयीक आयीक वाजते घंटा मंदिरात
कजागीन वाट पायते घरी॥
दोगयी निंगून गेले दोनीकडे
कौतुक आभायाले आवरलच नयी ॥
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷मालवणी अनुवाद
कविता-तुकोबाच्या भेटीक शेक्स्पीअर इलो
कवयित्री- अलका आंगणे,मालवण
तुकोबाच्या भेटीक| शेक्स्पीअर इलो|
तो झालो सोहळो दुकानात ||
झाली दोघांची| उराउरी भेट|
उरातला थेट| उरामध्ये ||
तुका म्हणता, "विल्या,| तुझा कर्म थोर |
अवघोची संसार| उभो केलो" ||
शेक्स्पीअर म्हणता, | "एक ता रवला |
तुया जा बगलं | विटेवरी"||
तुका म्हणता, "बाबा| ता तुया बरा केलंस |
त्येना तडे गेले| संसाराक ||
विठ्ठल अट्टल |त्येची रीत न्यारी |
माझी पाटी कोरी | लिहानव "||
शेक्स्पीअर म्हणता,| "तुझ्या शब्दांमुळे
मातीत खेळले| शब्दातीत"||
तुका म्हणता, "गड्या| उगीच शब्दपीट |
प्रत्येकाची वाट |येगळाली ||
येगळ्या वाटेत | येगळे काटे |
काट्यासंगे भेटता| पुन्हा तोच||
ऐक ऐक वाजता| घंटा ही मंदिरात |
कजागीण घराक | वाट पाहता"||
दोगा निघुनी| गेली दोन दिशा|
कवतिक आकाशाक | आवरेना||
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷तावडी अनुवाद
कविता-तुकोबाच्या भेटले शेक्स्पीअर आले
कवी-डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव
तुकोबाच्या भेटले शेक्स्पीअर आला l
तो योग घडला lदुकानात ll
दोघींनं मारली l येरायेरा मिठी l
हिरदाची दिठी lहिरदात ll
तुका म्हने 'विल्या ,lतुह्यं काम उमदं l
किती मोठं सम्दंl उभं केलंll'
शेक्स्पीअर म्हने, l'एक राही गेलं l
तुन्हं जे पाह्यलं l ईटवर ll
तुका म्हने ,बापा,lते बरं केलं तुन्हं l
तडे गेले त्यानं l संसाराले ll
विठ्ठल अट्टल l त्याची त-हा न्यारी l
माही पाटी कोरी lलिहिसनी' ll
शेक्स्पीअर म्हने,'lतुह्या सब्दांनं l
मातीले मियनं l सब्दांतीत ll
तुका म्हने,'गड्याl खोटं सब्दांचं पीठ l
परत्येकाची वाट l येगडीच ll
येगड्या वाटनं l येगडेच काटे lकाट्यासंग भेटे lपुन्हा तोच ll
ऐक ऐक वाजे lघंटा हे मंदिरी l
कजागीन घरी l वाट पाहे ll'
दोन्ही निंघी गेले lदोन्हीबी दिशांले l
कवतीक आकासाले lआवरे ना ll
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷आगरी अनुवाद
कविता-तुकोबाला भेटाला शेक्सपियर
कवी-तुषार म्हात्रे,पिरकोन (उरण)
तुकोबाला भेटाला। शेक्सपिअर आला।।
तो झाला सोहला।दुकानान.
झाली दोघवांची। उराउरी भेट
उरांनचा थेट।उरानच
तुका बोलं “विल्या। तुझा काम भारी;
सगलाच संसार। उभा केलास।।
शेक्सपीअर बोलं । यक त्या ऱ्हाला;।
तुनी ज्या बघला इटंवरी.
तुका बोलला, “बाबा त्या तू बरा केलास,
त्यानी चिरा परल्या। संसाराला
विठ्ठल अट्टल,। त्याची रीतूच न्यारी
माझी पाटी कोरी। लिवूनपुन.”
शेक्सपीअर बोलं। तुझे सबुदामुलं
मातीत खेललं।बिनसबुदाचा
तुका बोलं राजा। निसता सबुदच
परत्येकाची वाट। वायलीच
वायलीचं वाटं । वायलंच काटं;
काट्यासंग भेटं। परत तोच
आईक आईक वाजं । घंटा देवलान।
कजागीन घरा । वाट बघतंय.”
दोघवा निंघून गेलं दोन रस्तंला
कवतिक आबाला आवरंना।
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली
टीप-मूळ कविता विंदा करंदीकर यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी