🔶कविता-विठ्ठल🔶
कवी-विंदा करंदीकर
पंढरपूरच्या वेशीपाशी
आहे एक छोटी शाळा
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा ॥
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे
अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय?
न जाणो असेल विठ्ठल ॥
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🔷अहिराणी रुपांतर
कविता-ईठ्ठल
कवी-नितीन खंडाळे,चाळीसगाव
पंढरपूरना शीवजोगे
एक शे धाकली शाया;
सम्दा पोरे शेतस गोरा
एक पोर्या किट्ट काया ||
दांगडो करस, मस्त्या करस
खोड्या कराम्हा शे अट्टल;
मास्तर म्हने काय करो ?
ना जानो हुई ईठ्ठल ||
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷तावडी अनुवाद
कविता-ईठ्ठल
कवी-प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव
पंढरपूरच्या येसजोय
आहे एक छोटी शाया
सम्दे पोरं आहेती गोरे
एक पो-या कुट्ट काया ll
दंगा करतो मस्ती करतो
खोड्या क-यामधी आहे अट्टल
मास्तर म्हनता करनार काय
ना जानो असीन इठ्ठल ! ll
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷वऱ्हाडी अनुवाद
कवी-लोकमित्र संजय,नागपूर
पंढरपूर च्या वेसीजोळ
आहे एक लायनी शाळा
सारी पोर आहेत गोरी
एकच पोरगा डोमळा
दंगा करते, दांगळो करते
खोळ्या करण्यात आहेत
पटाईत...
मास्तर म्हणते कराव काय
न जाणो अशीन इठ्ठल ।।
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷आगरी अनुवाद
कविता-इठ्ठल
कवी-तुषार म्हात्रे, पिरकोन (उरण)
पंढरपूरचे येशीजरी
यक हाय बारकीशी शाला
सगली पोरा हायीत गोरी
यक पोऱ्या कुट काला।।
दंगा करतंय मस्ती करतंय
खोऱ्या करन्यान हाय
अट्टल...
मास्तर बोलतान कराचा काय?
नायतं तो हासाचा इठ्ठल!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷मालवणी अनुवाद
कवयित्री-मेघना जोशी (मालवण)
पंडरपूराच्या येशीर
एक शाळा आसा बारकी।
एकच पोरगो लय काळो
बाकीची पोरां पिटासारकी।।
दंगो करता धुमशान घालता
खोड्ये काडण्यात लय अट्टल।
मास्तर म्हणतंत करतंलास काय?
हयतोच निगाक शकता इट्टल।।
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली
टीप-मूळ कविता विंदा करंदीकर यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी
Chan. Arth ekach pan wachayla Maja yete ani bhasha pan Bari vat te Maja yete.
ReplyDelete