🔶कविता-वेडी🔶
कवी-विंदा करंदीकर
एका ढगाला कुशीत घेऊन ती झोपली,
तेव्हा तिला गर्भ राहिला.
पुढे सर्व सुरळीत झाले. आपल्या घरातले मातीचे मडके
मनमुराद फोडून ती देहान्ताच्या यात्रेला निघाली.
वाटेत तिला गाढव भेटले,
तिने त्याची समारंभपूर्वक पूजा केली.
धुपाटण्यातला उरलासुरला धूप कनवटीला लावून ती म्हणाली,
''ह्याचीसुद्धा राख होती तर कोणाला काय सांगणार होत्ये?
पण दैव शिकंदर आहे म्हणून कुत्र्यासारखे पुढे जाते''.
नंतर तिने वडाची पाने पिंपळाला लावली,आणि म्हणाली,
''आता मी कुणाचे काही लागत नाही पौर्णिमेएवढेही.''
पुढे सर्व सुरळीत झाले(हे मागे सांगितलेच आहे.)
वेडीला वीज झाली ;आपले स्तन विजेला देऊन
वेडी आपली पुढे गेली;
वाटेमध्ये विदूषक भेटला;
राजा भेटला , राणी भेटली; अ भेटला, ब'भेटला;
पण वेडी शहाणी होती,
तिने कोणालाच ओळखले नाही.
🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
🔷तावडी अनुवाद
कविता-येडी
कवी-प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे जळगाव
येका ढगा ले कुशीमधी घीसन ते जपली,तव्हा तिले गर्भ राह्यला.
पुढे समदं नीट झालं.तिच्या घरातलं माटीचं मडकं
मन भरी फोडीसन ते देहान्ताच्या यात्रे ले निंघाली.
वाटमधी तिले गधडं भेटलं ,तिनं त्याची सन्मानानं पुंजा केली.
धोपाटन्यामधला उरेलसुरेल धूप कानफटीले लायीसन ते म्हने ,
'ह्याचीबी राख व्हती तं कोन्हाले काय सांगनार व्हती ?
पन दैव सिकंदर आहे म्हनून कुत्र्यासारखं पुढे जातं .'
मंग तिनं वडाचे पानं पिप्पयाले लावले,आनं म्हनलं,
'आता मी कोन्हाचं काही लागत नही पुनवयेव्हढंबी.'
मंग समदं नीटनेटकं झालं ( हे पहिले सांगलंच आहे.)
येडीले ईज झाली ;आपले थाने ईजले दीसन
येडी आपली पुढे गेली; वाटमधी सोंगाड्या भेटला ;
राजा भेटला, रानी भेटली; अ भेटला, ब भेटला ;
पन येडी शहानी व्हती,तिनं कोन्हालेच वयखलं नही.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷अहिराणी अनुवाद
कविता-येडी
कवी-धोंडीराम मोरे,चाळीसगाव
एक ढगनासोबत ती निजनी
तवय ती गर्भार ऱ्हायनी .
पुढे सम्द नेंबन झायं
आपना घरनं माटीनं मडकं
मनभरी फोडं मंग तिनी जग सोडं.
वाटम्हा तिले गधडं भेटनं
तिन्ही त्यान्ही पुंजा कई .
चाटूम्हातला उरेलसुरेल धूप
पदरले पुसीसन ती बोलनी,
"यान्ही बी राकज व्हती तं
"कोनले काय सांगनार व्हती...? "
पन तिन्हं तगदीर मोठं
म्हनीसन कुत्रीनागत पुढे पुढे
जातंज ऱ्हायनी.....
मंग 'वडना पानं पिप्पयले ' लायी बोलाले लाघन्ही....
"आते मी कोनीबी, काहीबी लागत न्हई पुनीइतकं सुदीक ."
पुढे सम्दं नेंबन झायं....
(हाई मी पहिलेबी सांगेल से )
येडीले मंग ईज झायी
सवताना थाना ईजले दीसन
येडी पुढे गई.....
वाटवर तिले 'सोंगाड्या ' भेटना;
'राजा' भेटना ;'रानी' भेटनी ;
'आमका' भेटना ;'टमका' भेटना ;
पन ' येडी ' मोठी शानी व्हती ;
तिन्ही कोनलेज वयखं न्हई.... !!
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷वऱ्हाडी अनुवाद
कविता-म्याट
कवी- लोकमित्र संजय,नागपूर
एका ढगाले संग घेऊन ते झोपली
तेवा तीले गर्भ रायला
समोर सार चोकट झाल आपल्या घरातल मातीच मडक
मनभरुन फोळून ते
देहांताच्या जत्रेले निंगाली
रस्त्यात तीले गध भेटल,तीन
त्याची साजरी पूजा केली
धुपाटण्यातला उरला सुरला धूप
कानफटाले लावून ते म्हणाली
याची पण राख होते तं कोणाले
काय सांगणार होती ?
पण नशीब शिकंदर हाय म्हणून
कुत्र्यासारख पुडे जाते
मंग तीन वडाची पान पिंपळाले
लावली अन म्हणे
आता मी कोणाच कायी लागत नायी पोरणीमे एवडी
समोर सार चोकट झाल(मांग सांगतलच आहे)
म्याट वीज झाली, आपले थान विजेले देऊन गेली.
म्याट पुडे गेली,रस्त्यात
जोकर भेटला
राजा भेटला ,राणी भेटली, अ भेटला, ब भेटला
पण म्याट शायनी होती,तीन
कोणालेच वयखल नायी.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷मालवणी अनुवाद
कविता-खुळग्या
कवयित्री-कल्पना मलये,मालवण
एका ढगाक कुशीत घेवन जेवा ता निजला
तेवा ता गुरवार रवला
फुडे सगळा यवस्थित झाला .आपल्या घरातला मातयेचा मडक्या
मनासारख्या फोडल्यान आनि ता मयताक चलाक लागला.
वाटेत तेका गाढाव भेटला,तेनी तेची यवस्थित पूजा केल्यान
धुपाटण्यातलो उरलोसुरलो धूप तेनी कनवटेक लावल्यान आनि ता हुनला,
हेचीव रखा व्हती तर कोनाक काय सांगनार व्हतय?
पन दैव शिकंदर हा म्हनान कुत्र्यासारख्या फुडे जाता.
नंतर तेनी वडाची पाना पिपळाक लावल्यान ,आनि
हुनला
आता मी कोनाचा काय लागनय नाय पोरनिमेइतक्याव
फुडे सगळा यवस्थित झाला ( ह्या मागेच सांगलेला हा.)
खुळग्याक ईज झाली ; आपली दूधा ईजेक देवन
खुळग्या आपला फुडे गेला ; वाटेत ईदूषक भेटलो;
राजा भेटलो,रानी भेटली;अमको भेटलो,तमको भेटलो;
पन खुळग्या शेना व्हता ,तेनी कोनाकच वळखाक नाय.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
🔷आगरी अनुवाद
कविता-येरी
कवी-तुषार म्हात्रे,पिरकोन (उरण)
यके ढगाला कुशीन झेऊन ती निजली
तव ती पोटाशी ऱ्हाली
पुऱ्हचा सगला यवस्थित झाला.
आपले घरनचं मातीचं मरकं फोरून ती मरनाचे यात्रला निंघली.
वाटंन तिला गाऱ्हव भेटला,
तिनी त्याला बराबर पुजला
धुपाटनंचा ऱ्हालेला धूप कनवटीला लावून ती बोलली
“याचीपून राख व्हतंय तं कोनला काय सांगनार व्हतू?
पुन नशिब शिकंदर हाय म्हंगून कुत्रंसारी पुऱ्ह जातंय.”
मंग तिनी वराची पाना पिपलाला लावली न बोलली,
“आथा मी कोनचा काय लागं नाय पुनवंइतका.”
पुऱ्ह सगला यवस्थित झाला(या मिनी सांगलेलाच हाय)
येरीला इज झाली, आपलं थान इजला देऊन
येरी आपली पुऱ्ह जेली; वाटंन
इदुषक भेटला;
राजा भेटला, रानी भेटली; ‘अ’ भेटला, ‘ब’ भेटला;
पुन येरी शानी व्हती, तिनी
कोनलाच वलखला नाय.
🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺
टिपण:- प्रा.डॉ.प्रकाश सपकाळे,जळगाव
९७३०२२११५५
वेडी -प्रतिभा,नवनिर्माणक्षम प्रज्ञा
ढग --निर्मितीची बिजे असलेला अनुभव
गर्भ -- अनुभवाच्या प्रेरणेने
कलाकृती बीजरूपास येणे
मातीचे मडके --- पूर्वानुभव ,कलाकृतीत रूपांतरीत होण्याआधीची अवस्था
गाढव --- त्या कलेतलं काहीही न कळणारा
राख होणे -- ब-याच कलाकृतींचा गर्भपात होतो. वाफ होऊन जाते .आकाराला येतच नाही.
वडाची पाने पिंपळाला लावणे -- येथेही *साल* च्या ऐवजी पाने .
कलाकृतीत तार्किकता नसते.सुसंगती नसते.
कलाकृतीला पूर्णत्व आले की कशाचीही पर्वा नसते.
पौर्णिमा --पूर्णत्व
वीज --ढगात वीज निर्माण होते.
वीज --- निर्मिती
स्तन --- पोषणद्रव्य
विदूषक --- कोणत्याही गोष्टींची खिल्ली उडवणार
राजा /राणी -- त्या कलेतील अधिकारी ,जाणकार
अ ,ब -- नाव रूप ,ओळख नसलेले वाचक,समीक्षक
शहाणी --कोणाचीही दखल
न घेणारी शहाणी.
प्रतिभा ही कोणाचीही ,निंदा ,स्तुतीची दखल घेत नाही म्हणून शहाणी .
धन्यवाद!
#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली
टीप-मूळ कविता विंदा करंदीकर यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी
No comments:
Post a Comment