Wednesday, December 26, 2018

गणपत वाणी-बा.सी.मर्ढेकर

🔶कविता-गणपत वाणी🔶

कवी-बा.सी.मर्ढेकर
      
गणपत वाणी बिडी पिताना
चावायाचा नुसतीच काडी;
म्हणायचा अन मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी;

मिचकावुनि मग उजवा डोळा
आणि उडवुनी डावी भिवयी,
भिरकावुनि ती तशीच ध्यायचा
लकेर बेचव जैसा गवयी.

गिऱ्हाईकाची कदर राखणे;
जिरे, धणे अन धान्यें गळित,
खोबरेल अन तेल तिळीचे
विकून बसणे हिशेब कोळित;

स्वप्नांवरती धूर सांडणे
क्वचित बिडीचा वा पणतीचा
मिणमिण जळत्या; आणि लेटणे
वाचित गाथा श्रीतुकयाचा.

गोणपटावर विटकररंगी
सतरंजी अन उशास पोते;
आडोशाला वास तुपाचा;
असे झोपणे माहित होते.

काडे गणपत वाण्याने ज्या
हाडांची ही ऐशी केली
दुकानातल्या जमीनीस ती
सदैव रुतली आणिक रुतली.

काड्या गणपत वाण्याने ज्या
चावुनि चावुनि फेकुन दिधल्या,
दुकानांतल्या जमीनीस त्या
सदैव रुतल्या आणिक रुतल्या.

गणपत वाणी बिडी बापडा
पितांपितांना मरून गेला;
एक मागता डोळे दोन
देव देतसे जन्मांधाला!

🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

🔷अहिराणी अनुवाद

कविता-गनपत वानी

कवी-नितीन खंडाळे

गनपत वानी बिडी पेताना
चावत बठे नुस्तीस काडी
आनी मनम्हान म्हने का
हाई जागावर बांधसू माढी

मिचकाडीसन मंग उजवा डोया
आन उडायीसन डावी भोवई
फेकीसन ती तसीच धरे
लकेर निच्चळ जसा गवई

गिर्‍हाईकेस्नी किदर करानी
जीरं,धना आन धान्य गळीतन
खोबरान अन तेल तीळीनं
इकीसन बसस हिसाब करत

सपनवरते धुक्कय सोडस
कव्हय बिडीना कधी पनतीना
बागेबागे जयत्या; आनी पडस
वाचत गाधा तुकारामन्या

पोतडावर ईटकरी रंगनी
सतरंजी अन उशाले पोतं
आडोसाले वास तूपना
आसच झोपन माहित व्हतं

काड्या गणपत वान्यानी ज्या
हाडेस्न्या अशा कयात
दुकानम्हानन्या जिमीनमा त्या
कायिमन्या आखो गची गयात

काड्या गणपत वान्यानी ज्या
चायी चायी फेकी दिन्यात
दुकानम्हानना जिमीनमा त्या
कायिमन्या आखो गची गयात

गणपत वानी बिचारा बिडी
पेता पेता मरी गया
एक मांगता दोन डोये
देवबा देस जल्मआंधयाले !!

🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺🔺

🔷मालवणी अनुवाद

कवयित्री- मेघना जोशी

इडी फुकतांना गणपतवाणी

चगळीत होतो नुसती काडी

मनातल्यामनांत म्हणी होतो

या जाग्येरच बांदीन माडी

              मगे मारुन तो उजवो डोळो

              आणि उडवुन डावी भिवयी

              फेकूनच ती तशीच घ्येता

              तान पचपचीत जसो गवयी

गिराईकाची कदर करता

जिरां धने नि धान्या गळीत

खोबरेल नि तिळेल इकणा

आणि बसणां हिशेब ढवळीत

             

              कदी इडयेचो, कदी मिणमिणतो

              जळत्या पणतीचो, धूर सोडतां

               सपनांवर तो, आणि गाथा

              वाचत श्री तुक्याची, लवांडतां

गोणत्यावरती उडसावलेली

सतरंजी नि उशाक पोता

आडवशाक वास तुपाचो

असा झोपणां म्हायत् होता

              गणपतवाण्यान् ज्या हाडांची

              अशी कशी ही काडा केल्यान्

              दुकानातल्या जमीनीत ती

              कायम रुतवल्यान नि रुतवल्यान

काडये गणपतवाण्यान् जे

चगळून चगळून फेकून दिले

दुकानातल्या जमीनीत ते

रुतान ऱ्हवले आणि रुतले

              गणपतवाणी इडी बापडो

              फुकता फुकता मरान गेलो

              एक मागल्यार दोन डोळे

              आंदळयाक तो देव देतलो

धन्यवाद!

#ज्ञानभाषामराठीप्रतिष्ठान
#अनुवादित
#काव्यबोली

टीप-मूळ कविता बा. सी.मर्ढेकर यांची असून आम्ही बोलीतून अनुवादित करण्याचा प्रयत्न केला आहे जेणेकरून मान्यवर कवींच्या कविता पुन्हा काव्यप्रेमी रसिकांपर्यंत पोहोचतील आणि बोलीभाषेचाही अधिकाधिक प्रचार होईल.इथे कोणताही व्यापारी दृष्टीकोन नाही याची कृपया नोंद घ्यावी

No comments:

Post a Comment